संगमेश्वर:- तालुक्यातील मूर्शी रेणुसेवाडी येथे जमिनीच्या वादातून राजाराम संभाजी शेलार (६५) यांच्यावर त्यांचे नातेवाईक विठ्ठल रेणूसे, महेश रेणूसे आणि मालती रेणूसे यांनी मारहाण केली व महेश रेनुसे याने कोयत्याने वार केला. शनिवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मारहाणीची घटना घडली.
यामध्ये राजाराम शेलार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे दाखल करण्यात आले.त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तिन्ही संशयितांवर साखरपा पोलीस दुरक्षेत्र येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेतील फिर्यादी राजाराम शेलार शेतामध्ये गवत फवारणीचे औषध मारण्यासाठी गेले असता महेश रेणूसे व मालती रेणूसे त्यांना ते करू नका हे सांगण्यासाठी गेले असता एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली.
यावेळी संतप्त महेश रेणूसे याने राजाराम शेलार यांच्या पायावर जोरदार कोयत्याने वार केले.यामुळे त्यांना गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पुढील प्रक्रिया पार पडली. या घटनेचा तपास साखरपा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विद्या पाटील, अंमलदार संजय मारळकर, पोलीस नाईक हेमा गोतावडे, वैभव कांबळे, प्रशांत नागवेकर, किरण देसाई आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.