सव्वालाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला; महिनाभराने तक्रार दाखल

लांजा:– प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने पर्समध्ये असलेले एक लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे . १३ ते १४ मे या कालावधीत घडलेल्या या घटनेबाबत दिनांक १८ जून रोजी तब्बल महिनाभराने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद तालुक्यातील गवाणे रेवाळेवाडी येथील मधुरा विनायक रेवाळे ( वय २४ ) हिने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे . मधुरा रेवाळे ही विवाहित महिला दिनांक १३ ते १४ मे २०२३ रोजी माहेर वेळवंड पाली ते सासर गवाणे या दरम्यान प्रवास करत असताना तिने आपले सोन्याचे मंगळसूत्र , एक तोळे सोन्याचा हार आणि एक तोळ्याची सोन्याची चेन असे एकूण १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवले होते . मात्र अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले . ही घटना घडल्यानंतर तब्बल महिनाभराने म्हणजेच १८ जून रोजी मधुरा रेवाळेने याबाबत लांजा पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरा सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे . यानुसार लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नावलेकर करत आहेत.