सलग दुसऱ्या दिवशी चिपळुणात चार घरफोड्या

चिपळूण:- शहरात सलग दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शुक्रवारी राधाकृष्णनगरमध्ये ९ फ्लॅट फोडल्याच्या घटनेनंतर आज शनिवारी खेंड-कांगणेवाडी आणि बायपास परिसरातील तीन अपार्टमेंटमधील चार फ्लॅट चोरट्यांनी फोडले.

खेंड-कांगणेवाडी येथील ‘हरिदर्शन’ आणि ‘लक्ष्मीवैभव’ या दोन अपार्टमेंटमध्ये घरफोड्या झाल्या. हरिदर्शन अपार्टमेंटमध्ये सुरेखा माईगडे यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरले. याच अपार्टमेंटमधील दिनेश सागवेकर यांचा फ्लॅट फोडण्यात आला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तर, लक्ष्मीवैभव अपार्टमेंटमधील प्रमोद धामणस्कर यांचा फ्लॅट फोडण्यात आला, मात्र तेथेही चोरट्यांना काहीच मिळाले नाही. तसेच ‘द्वारका अपार्टमेंट’मधील प्रसन्ना जोशी यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसी टिव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.