आता ‘तीव्र आंदोलन’ छेडणार; मंत्री लोढांच्या आश्वासनावर पाणी
रत्नागिरी:- लाखो कुणबी बांधवांच्या ‘विशाल कुणबी एल्गार’ मोर्चाने सरकारला दिलेले आश्वासन केवळ ‘पोकळ’ ठरले आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात कुणबी बांधवांना आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन आठवडे उलटूनही या बैठकीचा पत्ता नाही. यामुळे कुणबी समाजोन्नती संघ आणि सर्व संलग्न संघटनांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यासाठी येत्या रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि ‘कुणबी’ नावाने मराठ्यांची ओबीसीत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ चा शासननिर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेना, ओबीसी जनमोर्चा यासह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात विराट मोर्चा काढण्यात आला होता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरसह कोकणातील लाखोंच्या संख्येने कुणबी बांधव या एल्गारामध्ये सहभागी झाले होते.
या विराट जनशक्तीमुळे सरकारचे धाबे दणाणले होते. त्यावेळी शिष्टमंडळाला सामोरे जाताना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारले आणि अवघ्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत प्रश्न सोडवण्यासाठी बैठक लावण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मात्र, आज तीन आठवडे झाले तरी बैठकीची कोणतीही माहिती नाही. याबद्दल कुणबी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत, “हा सरळसरळ कुणबी बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे,” असा आरोप कुणबी एल्गार मोर्चा, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, चे प्रवक्ता सुरेश भायजे,यांनी केला आहे.
कुणबी समाजाची मुख्य मागणी शासननिर्णय रद्द करण्याची असल्याने, ती मान्य न झाल्यास समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची सरकारला भीती आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक जाणूनबुजून टाळली जात आहे असे प्रवक्ते सुरेश भायजे यांनी सांगितले.
आता आंदोलनाची दिशा ठरणार!
सरकारच्या या फसवणुकीनंतर पुढील तीव्र आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, जिजाऊ संघटना, बळीराज सेना, कुणबी सेना, कुणबी सेवा संघ या सर्व कुणबी सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुलुंड येथील प्रबोधन हॉल, आंबेडकर नगर, विद्यार्थी वसतिगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कुणबी समाजाचे हे आंदोलन आता मुंबईसह कोकणातील राजकीय वातावरण आणखी ढवळून काढणार, आहे.









