संपाचा एसटीला मोठा फटका; पंधरा कोटींचे उत्पन्न बुडाले 

रत्नागिरी:- एसटी संप कालावधीत रत्नागिरी विभागाचे तब्बल १५ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. आतापर्यंतच्या एसटी च्या इतिहासातील हे सर्वात मोठे नुकसान आहे. महिना उलटून गेला तरी अद्यापही एसटी वेळापत्रक सुरु झालेले नाही.

 रत्नागिरी एसटी विभागात काम बंद आंदोलन जोमात असले तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी २७८ फेऱ्या सोडण्यात आल्या असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. रत्नागिरी शहर वाहतूक फक्त बंद असून जिल्ह्यातील सर्व आगारातून वाहतूक चालू करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान आज ५ जणांचे निलंबन करण्यात आले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ३३८ झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी ५९७ कर्मचारी हजर होते. यामध्ये प्रशासकीय २५६, कार्यशाळा १७९, चालक ६९, वाहक ६३, चालक तथा वाहक ३० यांचा समावेश होता. ७६ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. कर्मचारी हळुहळू कामावर हजर होत असल्याचा दावा रत्नागिरी एसटी विभागाने केला असून वाहतूकही सुरळीत होऊ लागली आहे. सध्या विभागातील ३७७९ पैकी ३१०४ कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

दरम्यान, खासगी वाहतुकीद्वारे प्रवासी वाहतूक ग्रामीण भागात चालू आहे. कारण एसटी ठप्प असल्याने ग्रामस्थांना बाजारपेठ, तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता कोणतीही सोय नसल्याने या खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.