संगमेश्वर:- रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.
रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि जनजीवन ठप्प झाले आहे. या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
रामपेठचे पोलीस पाटील श्री. कोळवणकर यांनी बोलताना सांगितले की, “पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने व्यापारी आणि नागरिकांना आपले मौल्यवान सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.”
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील इतर भागांतही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर आहेत.