संगमेश्वर येथे गांजा सेवन करणाऱ्या पाच जणांना अटक

संगमेश्वर:- संगमेश्वर पोलीस गस्त घालत असताना मुबंई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील शास्त्रीपुल बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जंगल असलेल्या ठिकाणी आडोशाला पाच जण गांजा सेवन करताना आढळून आले. या पाचही जणांना संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमाराची आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना शास्त्रीपुल बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जंगल असलेल्या ठिकाणी दिपेश छाया कदम (वय 23 वर्षे, मुळ रा. नायरी बौध्दवाडी, ता. संगमेश्वर सध्या राहणार कसबा चांभार मोहल्ला), रहिम रहिस रायनो (क्य 19 वर्षे, रा. साया स्टॉप कसबा, ता. संगमेश्वर), साहिम साजिद दळवी (वय 27 वर्षे, रा. शास्त्रीपुल कसबा, पारकरवाडा, ता. संगमेश्वर), अर्षद रफिक काझी (वय 29 वर्षे, रा. साया स्टॉप कसबा, ता. संगमेश्वर), कैफ ताहिर उपाध्ये (वय 18 वर्षे, रा. कसबा, आगेपीर, ता. संगमेश्वर) यांच्याकडे अंमली पदार्थ सेवन करण्याचे उद्देशाने असलेले साहित्य आढळून आले. तसेच गांजा सदृश्य पद्धार्थाचे सेवन करताना हे पाचही जण मिळून आले.

या सर्वांना संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करत आहेत.