संगमेश्वर मारहाण प्रकरणातील 6 जणांवर गुन्हा

6 जणांच्या अटकेनंतर पोलिस कोठडी

संगमेश्वर:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुक वर टाकल्याचा राग मनात आल्याने फेसबुक पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र चव्हाण रा. कडवई , तालुका अध्यक्ष अनुराग महेंद्र कोचिरकर रा. देवरुख,  शेखर बाळकृष्ण नलावडे, रा . देवरुख, सनी श्रीकांत प्रसादे, रा . देवरुख,  सलमान अल्लीहुसेन बोदले यांच्यासह फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणारे विवेक चव्हाण यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयासमोर उभे केले असता यातील पोस्ट शेअर करणाऱ्याला 1 दिवसाची तर बाकीच्यांना 2 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश असताना विवेक चव्हाण यांनी  मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर फेसबुकवर टाकल्याने जितेंद्र चव्हाण, अनुराग महेंद्र कोचिरकर, शेखर बाळकृष्ण नलावडे, सनी श्रीकांत प्रसादे,   सलमान अल्लीहुसेन बोदले यांनी बेकायदेशिर जमाव करुन साई मेडीकल संगमेश्वर बाजारपेठ येथे शिवीगाळी करून लाथा बुक्यांनी मारहाण करून साई मेडीकल मध्ये प्रवेश करून शिवीगाळी व दमदाटी करून दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करून सदर ठिकाणी सार्वजनिक शांतता भंग होण्याच्या दृष्टिने दंगा केल्याने फिर्यादीत म्हटले आहे.

 विवेक नंदकुमार चव्हाण (शिवणे, तेर्‍ये, संगमेश्वर), जितेंद्र चव्हाण, अनुराग कोचिरकर, शेखर नलावडे, सनी प्रसादे, सलमान अल्लीहुसेन बोदले (सर्व रा. संगमेश्वर) यांच्यावर शांततेचा भंग केल्याप्रकरणी भादविकलम 143, 145, 147, 149, 452, 504, 506 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1), (3), 110/117, 112/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी पोलीस स्थानकात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. एस. शिंदे करत आहेत.