संगमेश्वर:- तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा घराजवळ येऊन बिबट्या पाळीव कोंबड्यांवर हल्ले करत असून शिवणे व माभळे परिसरातील कोंबड्यांवर त्याने डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत सलग तीन दिवस बिबट्याची ‘इन्ट्री’ झाल्याचे स्पष्ट झाले असून बाजार परिसरात पायांचे ठसे आढळून आले आहेत.
याचबरोबर काही ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. बिबट्याच्या हालचालींमुळे कुत्र्यांनीही धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवणे गावात बिबट्याने एका महिलेला जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता बिबट्याने गावातील पाळीव कोंबड्यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थ आर्थिक नुकसान सहन करत असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून पिंजरा लावावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









