संगमेश्वर अणदेरी येथे महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील अणदेरी होडे वाडीतील महिला कपडे धुण्यासाठी पऱ्यावर गेली असता कातळावरून पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना आज दुपारी बारा साडेबारा वाजता घडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थानी दिली.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अणदेरी होडेवाडीतील चार महिला कपडे धुण्यासाठी घराशेजारील पऱ्यावर गेल्या होत्या, त्यापैकी सुनीता जयराम होडे (वय अंदाजे ५६ ) या महिलेचा पाय कातळा वरून घसरला आणि ती पाण्यात पडली.

गुरुवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे पऱ्याला पाणी मोठे असल्याने सुनीता ही पाण्यातून वाहत गेली. सुनीताला वाहत जाताना पाहुन इतर महिलांनी आरडा ओरडा केला; नजीक असणा-या ग्रामस्थानी पऱ्याकडे धाव घेतली, शोधाशोध केली असता नजिकच ती महिला सापडली.

तिला गावचे सरपंच दिनेश मालप, बाळु होडे, विश्वास होडे, यांच्या मदतीने त्या महिलेचे पती जयराम होडे यांनी तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले , मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केल्याने ऐन गणेशोत्सवात अणदेरी गावावर शोककळा पसरली आहे.

मृत सुनीता हिच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थानी संगमेश्वर पोलिसांना दिली असुन आधिक तपास फणसवणे बिटचे अंमलदार श्री सचिन कामेरकर, करीत आहेत.