रत्नागिरी:- ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांच्या संगणक परिचालकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आधीच तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या संगणक परिचालकांची शासनाकडून थट्टा सुरू आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, ४१२ संगणक परिचालक कार्यरत आहेत. काही संगणक परिचालकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. कामे करूनही मानधन मिळत नसल्याने संगणक परिचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतींतर्गत ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा’ केंद्रातर्फे संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली १२ वर्षे या संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकार बदलले, अधिकारी बदलले परंतु आमच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी कोणालाच वेळ नाही, अशी खंत संगणक परिचालक व्यक्त करत आहेत. प्रत्येक सरकारच्या मंत्र्यांनी आतापर्यंत आश्वासनेच दिली आहेत.
आपले सेवा सरकार केंद्रातर्फे जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, उत्पन्नाचे दाखले, विविध शासकीय योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया यांसाखी विविध कामे करून घेण्यात येतात. मात्रसंगणक परिचालकांना थकीत मानधन, अपुरे मानधन, बदलत्या शासन धोरणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यामातून ग्रामीण भागातील जनतेला सेवा पुरविण्यात येत आहेत. मात्र, आधीच तुटपुंजे मानधन असताना तेसुद्धा नियमित मिळत नसल्याने सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे असे हरिश वेदरे, कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटना यांनी सांगितले .









