चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील चोरीचा अवघ्या 36 तासात छडा लागला आहे. हा छडा लावण्यात श्वान पथकाने मोठा हातभार लावला असून श्वानाच्या मदतीने चोरटा हाती लागला आहे.
सावर्डे येथील कंळबट गावामध्ये महिलेचे घर फोडून अज्ञाताने २१ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली होती. ही घटना १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत घडली होती. याबाबत महिलेने लागलीच सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सावर्डे पोलीसानी अज्ञातावर भा.द.वि.कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास व स.पो.नि. श्री. रत्नदिप साळोखे, सावर्डे पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होता. काळोखे यांनी एक पथक तयार केले व गावातील तसेच गावाजवळील काही संशयित लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. पोलिसाना काही लोकांचा संशय आला होता. परंतु पुराव्या अभावी काही शक्य नव्हते. पोलिस बारीक लक्ष ठेवून होते.
दरम्यान पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. रत्नागिरी पोलीस दलाच्या श्वान पथकात कार्यरत असलेला श्वान ” विराट” घटनास्थळी दाखल झाला. चोरट्याचा सुगावा लावण्यासाठी स.पो.नि श्रीमती. मढवी यांनी घटनास्थळी मिळून आलेल्या पर्सचा वास श्वान विराटला त्याच्या हस्तकांद्वारे देण्यास सांगितले. पर्सचा वास घेताच श्वान विराट सुमारे १५० मिटरच्या अंतरावर धावत सुटला. त्याच्या मागून पोलिस ही धावत होते. शेवटी गावातल्या वाडीतीलच एका घराजवळ येऊन श्वान थांबला. घरात लपून बसलेल्या त्या संशयितांवर श्र्वानाने भूंकण्यास सुरुवात केली. त्याने घराच्या दिशेने इशारा केला. श्वानाने इशारा देताच व तपास पथक आपल्या घरात चौकशीकरिता शिरताच घरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीची गाळण उडाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. अवघ्या 36 तासात श्र्वानाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये श्रीमती. जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, डॉ. श्री. सचिन बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण, श्री. रत्नदिप साळोखे, स. पो. नि. सावर्डे पोलीस ठाणे, श्रीमती. मढवी, स.पो.नि, श्वान पथक, रत्नागिरी, श्रीमती. धनश्री करंजकर, पो.उ.नि. सावर्डे पोलीस ठाणे, प्रदिप गमरे, स. पो.फौ. सावर्डे पोलीस ठाणे, पो. हवा / ७७ राजेंद्र आरवट, सावर्डे पोलीस ठाणे, पो.हवा / ९२२ घुगरे, चालक, श्वान पथक, रत्नागिरी, पो. हवा / ८००, हरचिरकर, श्वान हस्तक, रत्नागिरी, पो. हवा / ४४१, कोतवडेकर, श्वान हस्तक, रत्नागिरी, श्वान विराट, श्वान पथक, रत्नागिरी, पो.ना. / ३०० सावंत, सावर्डे पोलीस ठाणे व पो.कॉ / १५९५ चव्हाण, सावर्डे पोलीस ठाणे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार / श्वान यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.