रत्नागिरी:- महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मागील पंधरा दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून स्थानिक व्यापार्यांसह येणार्या हजारो भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने घरगुती व्यवसायांवर परिणाम झाला असून कँनिग व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. विनाकारण आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यावर तत्काळ उपायोजना करा, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचाचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिला आहे.
असह्य उन्हाळा त्यातच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यापार्यासह भाविक आणि पर्यटक कमालीचे त्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह दूरदूरचे पर्यटक उन्हाळी सुट्टी म्हणून हजारोंच्या संख्येने इथे आलेले असताना विद्युत पारेषण कंपनीने मागील पंधरा दिवस विद्युत पुरवठा अनियमित करण्याचा चंग बांधला आहे. त्यातून संपूर्ण पंचक्रोशीत नाराजी पसरली आहे. गणपतीपुळे विभागात अंदाजे ३४ हजार विद्युत मीटरधारक असून या अंतर्गत ७८ गावे येतात. वीज नसल्याने घरगुती व्यवसायांवर परिणाम झाला असून कॅनिग व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. लॉज मालकांना तसेच मंगल कार्यालयात ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. काहींना भाड्याने जनरेटर आणून अकारण आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. गणपतीपुळे पर्यटन विकास अंतर्गत अनेक घोषणा लोकप्रतिनिधी करतात. पण वीज वितरण या मुलभूत सुविधेकडे लक्ष न देता जाणूनबुजून त्रास देतात. नियमित वीजबिले भरुनही व्यवसाय उद्योग उदीमावर परिणाम होत आहे.









