Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू

शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू

प्रभानवल्ली येथील घटना

लांजा:- शेतातील सुकलेल्या गवताला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे घडली आहे. विष्णू महादेव खेगडे (वय ६५, रा. प्रभानवल्ली गोसावीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू खेगडे यांच्या मालकीची प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील ‘कटकी’ नावाच्या डोंगराळ भागात जमीन आहे. सोमवार, २३ मार्च रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास या जमिनीतील सुकलेल्या गवताला अचानक आग लागली होती. हा वणवा वेगाने पसरत असल्याचे पाहून खेगडे हे आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी धावून गेले.

​दुपारची वेळ आणि वाऱ्याचा वेग यामुळे वणव्याने रौद्र रूप धारण केले होते. आग विझवण्याच्या प्रयत्नात असताना खेगडे हे आगीच्या विळख्यात सापडले. आगीची धग प्रचंड असल्याने ते गंभीररीत्या भाजले गेले आणि दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
​याप्रकरणी मयत खेगडे यांच्या पत्नी वनिता विष्णू खेगडे यांनी लांजा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे केली आहे.

​उन्हाळ्याच्या दिवसांत कोकणात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आपला शेतीचा भाग वाचवण्यासाठी गेलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने प्रभानवल्ली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.