रत्नागिरीः– घराच्या शेजारी घर बांधल्याच्या रागातून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील कळझोंडी येथे ही घटना घडली.
अमित अनंत आग्रे (वय ३५, रा. शिंदेवाडी, कळझोंडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास कळझोंडी येथील तिसंगी नदीच्या पुलावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश अनंत शिंदे (वय ३८, रा. कळझोंडी-शिंदेवाडी) हे आणि संशयित शेजारी राहणारे आहेत तर संशयितास मद्याचे व्यसन आहे. शिंदे यांनी संशयिताच्या घराशेजारी घर बांधल्याच्या रागातून तिसंगी नदीपूल येथे शिंदे व त्यांच्या वडिलांना संशयिताने शिवीगाळ केली व अविनाश यांच्या हातावर लाकडी दांडा मारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अविनाश शिंदे यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.