शेअर मार्केटच्या नावाखाली वृद्धाची १८ लाखांची फसवणूक

दापोली येथील घटना; सायबर भामट्याकडून ‘प्रोक्सट्रेंड’ साईटद्वारे फसवणूक

दापोली:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख ३७ हजार ४८९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मयंक सिंग नावाच्या व्यक्तीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी दिगंबर दौलत हरेकर (वय ७२, रा. गव्हे लोहारवाडी, दापोली) यांना १० डिसेंबर २०२५ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मयंक सिंग याने मोबाईल क्रमांक +४४७८२२१०७८०४ वरून संपर्क साधला. आरोपीने फिर्यादींना शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेऊन मोठा फायदा मिळवता येईल, असे आमिष दाखवले.

आरोपीने फिर्यादींना एक लिंक पाठवून ‘Proxtrend’ नावाची साईट डाऊनलोड करण्यास सांगितली. प्रशिक्षणाच्या बहाण्याने त्यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करायला लावून फिर्यादीची सर्व वैयक्तिक माहिती हस्तगत केली.आरोपीने फिर्यादींना डॉलरमध्ये ट्रेडिंग करण्यास सांगून सुरुवातीला विश्वास संपादन केला. अधिक फायदा मिळवण्यासाठी आणखी गुंतवणुकीची गरज असल्याचे भासवून, आरोपीने टेलिग्राम आणि mayank.s@team.proxtrend.com या ईमेल आयडीवरून वेळोवेळी संपर्क साधला. अशा प्रकारे दिशाभूल करून आरोपीने फिर्यादीकडून एकूण १८,३७,४८९.८८ रुपये ऑनलाईन स्वीकारले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.

​दिगंबर हरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (डी)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.