शृंगारतळीत सापडल्या ४० हजारांच्या बनावट नोटा

बँकेकडून तक्रार दाखल; तालुक्यात खळबळ

गुहागर:- दोन दिवसावर मतदान आलेले असतानाच तालुक्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शृंगारतळी शाखेत चाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील संशयितावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या शृंगारतळी शाखेत एका खातेदाराने ४० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्याच्याकडून शंभर रुपयांच्या नोटांची बंडले देण्यात आली होती. कॅशियरने या नोटा तपासल्या तेव्हा त्या खोट्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेच्या शाखा व्यवस्थापक व अन्य कर्मचाऱ्यांसह गुहागर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबतची तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यामधील एकाकडे १०० रुपयांची १ नोट बनावट असल्याचे आढळून आले होते. याची कुजबुज सुरू असताना आज पुन्हा एकदा शंभर रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे समोर आल्याने गुहागर तालुक्यात खळबळ माजली आहे.