रत्नागिरी:-एसटी कर्मचार्यांचा संप अद्यापही सुरुच असून शुक्रवारी आता पुढील सुनावणी असल्याने जिल्ह्यातील संपात असलेल्या सर्व कर्मचार्यांचे लक्ष आता या सुनावणीकडे लागून राहिले आहे. विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी मोठ्या संख्येने कर्मचारी गोळा झाले होते.
एसटी कर्मचारी संपाला शंभर दिवस उलटून गेले असून, जिल्ह्यात अनेक कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले असून, हजारहून अधिक कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्मचारी अद्यापही विलणीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून मोठ्या संख्येने कर्मचारी विभागीय कार्यालयाबाहेर गोळा झाले होते. याठिकाणी विठ्ठल रखुमाईची पूजा करुन नामजपही करण्यात आला. काही कर्मचारी उत्स्फुर्तपणे संवाद साधत उपस्थितांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी दुपारी अडीच वाजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर होणार असल्याने कर्मचार्यांचे लक्ष सुनावणीकडे लागून राहिले होते. विभागीय कार्यालयाबाहेर जमलेले कर्मचारी मोबाईलवरुन मुंबईतील कर्मचार्यांकडून अपडेट जाणून घेत होते. याबाबत शुक्रवारी सुनावणी असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. शासनाने सादर केलेल्या अहवालात नेमके काय आहे याची उत्सुकताही एसटी कर्मचार्यांना लागून राहिली आहे.