रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिरगाव-बाणखिंड येथे रिक्षेला ओव्हरटेक करताना समोरुन येणार्या डंपरला एसटीची धडक बसून अपघात झाला.या अपघातात एसटीमधील सात जणांना दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची ही घटना सोमवार 4 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वा.घडली आहे.
या अपघातात एसटी वाहक संदीप सावंत (36), मनोहर केशव मयेकर(70), अरविंद कांबळे (34),तुकाराम डिंगणकर (55), दिक्षा गावडे (33), सुनिल दत्ता मयेकर (59), प्रियंका मयेकर (54) या सात जणांना दुखापत झाली आहे. याबाबत डंपर चालक मोहम्मद युसुफ वकिल अहमद (22, रा.मानसकोंड,संगमेश्वर) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानूसार,सोमवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-08-एच-1300) घेउन गणपतीपुळेच्या दिशेने जात होते.त्याच सुमारास एसटी चालक रविकांत मिसाळ आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-2665) मधून 20 प्रवाशांना घेउन गणपतीपुळे ते गडहिंग्लज असा जात होता.ही दोन्ही वाहने शिरगाव-बाणखिंड येथे आली असता समोरील रिक्षेला ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटीची समोरुन येणार्य डंपरला समोरा-समोर धडक बसून हा अपघात झाला.अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.









