शिक्षिका खून प्रकरणातील दुसऱ्या संशयितास अटक

चिपळूण:- शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथून रविशंकर कांबळे याला पोलिसांना अटक केली. त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा ६ ऑगस्टला खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांचे जाबजबाब नोंदवले व ट्रॅव्हल एजंट जयेश गोधळेकर याला त्याच दिवशी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या प्रकरणात अन्य एक साथीदार असल्याचे पुढे आले. दुसरा संशयित रविशंकर कांबळे याचा शोध सुरू झाला. तो मूळचा सातारा येथील होता. त्याच्या फोनचे सीडीआर मिळवण्यात आले. त्यामध्ये तो अनेकदा कर्नाटकमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले.