रत्नागिरी:- मी जरी शिक्षण मंत्री नसलो तरी मा. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवून मुख्याध्यापक व शिक्षक यांची शाळाबाह्य कामातून मुक्तता करण्यासाठी वचनबद्ध असून लवकरच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षणमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी रत्नागिरी येथील जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत दिले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१५ रोजी शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांची शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या व गुणवत्तेच्या बाबतीत आढावा सभा घेण्यात आली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, वरिष्ठ लेखाधिकारी प्रवीण बिरादार, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ कोल्हापूर विभागीय सचिव रमेश तरवडेकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्रीशैल्य पुजारी , खेड तालुका अध्यक्ष प्रशांत खेडेकर, गुहागर तालुका अध्यक्ष मंगेश गोरीवले, मंडणगड सचिव श्री.कापसे सर, लांजा तालुका अध्यक्ष संदेश कांबळे , राजापूर अध्यक्ष भारत कांबळे, दापोलीचे सचिव सुनील देसाई, चिपळूण अध्यक्ष संजय चव्हाण संगमेश्वर अध्यक्ष कुसनाळे सर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद दळी ,रा. भा. शिर्के विद्यालय चे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या आढावा मुख्याध्यापक सभेत रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्यासमोर शैक्षणिक समस्या मांडण्यात आल्या. त्यातील काही समस्या पालकमंत्री मा. उदयजी सामंत यांनी कार्य तत्परता दाखवून तत्काळ सोडविल्या. सद्य स्थितीत दहावी व बारावी बोर्डाच्या अंतर्गत परीक्षा सुरू आहेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक शाळांमधून उपस्थित असणे गरजेचे आहे. अशा स्थितीत इयत्ता सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावी यांचे प्रशिक्षण लावण्यात आलेले आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्याचे काम बाजूला ठेवून प्रशिक्षणाला जावे लागत आहे. सर्व प्रशिक्षणे बोर्डाच्या परीक्षा व पेपर तपासणी झाल्यानंतर घेण्यात यावी अशी विनंती मुख्याध्यापक यांनी करताच तात्काळ पालकमंत्री मा. उदयजी सामंत यांनी डायट प्राचार्यांना फोन करून सदर प्रशिक्षणे तत्काळ थांबविण्याच्या सूचना केल्या मुख्याध्यापकांना प्रशासनाकडून वेळी अवेळी व्हाट्सअप मेसेज करून तत्काळ माहिती देण्याबाबत अथवा अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले जाते.यामुळे मुख्याध्यापक त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. यापुढे रात्री अपरात्री कोणतेही कामासंबंधी मेसेज करून त्वरित माहितीची मागणी करण्यात येऊ नये. अशा सूचना देण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना करण्यात आल्या.
निपुण चाचणी घेत असताना झेरॉक्स चा खर्च , तसेच लागणारा वेळ , व्ही ॲप वर भरावी लागणारी माहिती याबाबत सर्व स्तरावरून विरोध होत असल्याने या उपक्रमाच्या अंमलबजावणी करिता आत्ताची वेळ ही योग्य वेळ नाही. याकरिता आर्थिक सहाय्य आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री उदयजी सामंत यांनी तत्काळ फोन द्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर उपक्रम सद्य स्थितीत थांबवून दहावी बारावी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना वेळ देण्याबाबत सूचना केल्या. या सर्व सूचना सभा सुरू असतानाच पालकमंत्री यांनी संबंधित विभागाला केल्याने मुख्याध्यापक यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले तसेच वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार जास्तीत जास्त शाळांना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा देण्याबाबत, २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, शिक्षकेतर भरती तत्काळ करण्यात यावी विनाअनुदानित अथवा टप्पा अनुदानित वरून अनुदानित शाळेत बदली वरील बंदी तत्काळ उठविण्यात यावी, विनाअनुदानित अथवा टप्पा अनुदानित शाळांना वयानुसार पुढील टप्पा देण्यात यावा, संच मान्यतेतील त्रुटी तत्काळ दूर करण्यात याव्यात, शिक्षण विभागामध्ये तसेच वेतन पथकामध्ये अपुरी कर्मचारी पदे तत्काळ भरण्यात यावी, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडील अन्य कार्यभार कमी करण्यात यावा अशा समस्यांबाबत शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्यासोबत सभा लावली जाईल. त्याचे नेतृत्व पालकमंत्री म्हणून मी स्वतः करेन असे मा. उदयजी सामंत यांनी स्पष्ट केले.
या सभेप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांचा जिल्हाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनात विशेष सहभाग दर्शवल्याबद्दल सन्मान केला तसेच माध्यमिक लेखाधिकारी यांची पदोन्नती ने जिल्हा कोषागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला