शिकारीच सापडले पोलिसांच्या जाळ्यात; बंदुकीसह 6 जिवंत काडतुसं जप्त

संगमेश्वर:- शिकारीसाठी जंगलात आलेल्या तिघांना पोलिसांनी बंदुकीसह ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक सिंगल बॅरल काडतुस बंदुक, 6 जिवंत काडतुसं, 1 मोबाईल फोन, 1 हेड चार्जिंग बॅटरी, 1 एलईडी चार्जिंग बॅटरी, 2 डब्यात गन पावडर व लहान मोठ्या आकाराचे शिस्याचे बॉल, 1 मल्टीपर्पज स्टिलचा चाकू व इतर शिकरीचे साहित्य जप्त करण्यात आले.

विश्वास विष्णु हेमंत (वय – 29, रा. माखजन, हेमंतवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, रविंद्र आत्माराम गुरव (वय – 35, रा. धामापूर तर्फे संगमेश्वर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी आणि अभिजित गोविंद मांडवकर (वय -45 वर्षे, रा. आंबव-पोंक्षे, मांडवकरवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून काही इसम संगमेश्वर येथील जंगलामध्ये वन्यजीवी प्राण्यांची शिकार करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुरेश गावीत, संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संगमेश्वर येथील मौजे मुरडव-आरवली येथे गस्त घालत असताना मोटासायकलवर बंदुकीसह तिघे जण जात असल्याने त्यांना पकडण्यात आले. चौकशीअंती बंदुक विनापरवाना असल्याचे आणि तिघेही शिकारीसाठी जंगलात जात असल्याचे उघड झाले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे एक सिंगल बॅरल काडतुस बंदुक, 6 जीवंत काडतुस, 1 मोबाईल फोन, 1 हेड चार्जिंग बॅटरी, 1 एलईडी चार्जिंग बॅटरी, 2 डब्यात गन पावडर व लहान मोठ्या आकाराचे शिस्याचे बॉल, 1 मल्टीपर्पज स्टिलचा चाकू व इतर शिकरीचे साहित्य मिळून आले.

पोलिसांनी तिन्ही आरोपांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 भा.द.वि संहिता कलम 34 व मोटर वाहन कायदा कलम 128/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश गावीत, संगमेश्वर पोलीस ठाणे व पथका द्वारे सुरू असताना शुक्रवारी आणखी एका आरोपीस घेण्यात आले. सुदेश हनुमंत मोहिते (वय – 33, रा. मखाजन, ता. संगमेश्वर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 10,000 किमतीची एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल ठासणीची बंदुक जप्त करण्यात आलेली आहे.