देवरुख:- वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे, बॅटऱ्या आणि एक दुचाकी असा एकूण १,४६,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यात होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार, पोहेकॉ अभिषेक वेलवणकर आणि पोहेकॉ सचिन कामेरकर हे दोघे काल रात्री साध्या वेशात खाजगी वाहनाने गस्त घालत होते. रात्री २.१५ वाजताच्या सुमारास त्यांना विघ्रवली एस.टी. बस स्टॉपजवळ दोन तरुण एका दुचाकीजवळ थांबलेले दिसले. त्यापैकी एकाने डोक्याला बॅटरी लावली होती. यामुळे पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी त्यांना थांबवून विचारणा केली असता, त्यांनी खेकडे पकडण्यासाठी जात असल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठीमागे बसलेल्या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे लपवलेली बंदूक आणि जिवंत काडतुसे सापडली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रितेश प्रतिपाल आडाव (वय २६, रा. कांजीवरा, देवरुख) आणि साहिल संतोष कदम (वय १९, रा. ओझरे बौध्दवाडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हे साहित्य बाळगल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी गावठी बनावटीची बंदूक, विविध कंपन्यांची जिवंत काडतुसे, दोन बॅटऱ्या आणि एम.एच.०८/बी.एच./५०७५ क्रमांकाची ज्युपिटर कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींवर भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३ (१)/२५ आणि बी.एन.एस. २०२३ चे कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.