शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेशाचा श्रीगणेशा; ७९ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

विविध विभागांचे काम युद्धपातळीवर; ७ डॉक्टरही मंजूर

रत्नागिरी:- रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहे. महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मेडिकल कॉलेजच्या विविध विभागांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या वर्षीच्या एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी १०० मुलांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ७९ मुलांचे प्रवेश झाले आहेत. दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
कॉलेजसाठी एकूण ३० डॉक्टर प्राध्यापकांपैकी सध्या ७ डॉक्टर मंजूर झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती; मात्र त्याला अपेक्षित राजकीय इच्छाशक्ती पुरेशी नव्हती. त्यामुळे हा विषय रेटला जात नव्हता; मात्र तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी रत्नागिरी मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी जोरदार इच्छाशक्ती प्रकट केली. एवढेच नाही, तर त्यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू केला. त्यांच्या या प्रयत्नाला एकनाथ शिंदे यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळाल्या आहेत. महिला रुग्णालयाची इमारत, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय क्लब करून या कॉलेजच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेडिकल कॉलेजच्या कामाला अपेक्षित गती मिळत नव्हती. डिनचीही नियुक्ती करण्यात आली आहे; पालकमंत्री उदय सामंत याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. कामाला गती मिळावी यासाठी शासनस्तरापासून ते स्थानिक पातळीवर मंत्री सामंत याचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे मेडिकल कॉलेजचे काम वेगाने सुरू झाले आहे. महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे मेडिकल कॉलेज होणार आहे. तयार इमारत असल्याने अंतर्गत बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लेक्चर रूमपासून विविध विभाग आधुनिक पद्धतीने बांधण्यात येत आहेत.

राज्याच्या ८५ तर केंद्राच्या १५ जागा

एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये केंद्र शासन आणि राज्यशासनाचा जागांचा कोटा आहे. राज्य शासनाच्या ८५ जागा तर केंद्राच्या १५ जागा आहेत. राज्य शासनाच्या पहिल्या टप्प्यात मुलाखती घेऊन ७२ जागा भरण्यात आल्या आहेत. तर केंद्राच्या ७ जागा भरल्या आहेत. उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत. मेडिकल कॉलेजसाठी ७ डॉक्टर मंजूर झाले आहे. त्यामध्ये मेडिसिन, ऑर्थो आदी डॉक्टरांचा समावेश आहे. सामंत याच्या पाठपुराव्यामुळे मेडिकल कॉलेजच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे.