शाळा, महाविद्यालय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा

 एसटी वाहतूक ठप्प असल्याने प्रवास खर्च वाढला 

रत्नागिरी:- एसटी कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा आर्थिक फटका माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. अडीचशे ते तीनशे रुपये अदा केले की, महिनाभर महामंडळाच्या बसने शाळा व महाविद्यालयांत वेळेवर आणि सुरक्षितपणे जाता येत होते. बससेवा ठप्प असल्यामुळे आता दररोज 30 ते 40 रुपये खर्चुन विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी शाळा गाठावी लागत आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील जवळपास 40 ते 45 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट एसटी महामंडळ कामगारांच्या संपामुळे महाग झाली आहे. त्यामुळे या संपाबद्दल विद्यार्थ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या सत्तर-बाहत्तर वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी राज्यभरातील जवळपास लक्ष 99 टक्के रस्त्यांवरून अहोरात्र धावत आहे. 1990-95 सालापर्यंत दळणवळणासाठी लालपरीशिवाय पर्यायच नव्हता. जिल्हा आणि तालुका ठिकाणी महाविद्यालये आणि माध्यमिक शाळा असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना लालपरी भरवशाची होती. महामंडळाने महाविद्यालयीन व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात तब्बल 66 टक्के सवलत दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत खेड्यापाड्यांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला लालपरीने हातभार लावलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या मुलींना मोफत प्रवासाची सवलत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलींची साक्षरता वाढली आहे. गोरगरीब घराण्यांतील अनेक मुलींनी तालुका आणि जिल्हा ठिकाणी असलेल्या शाळा, महाविद्यालयांत प्रवेश घेऊन अभियंता, डॉक्टर, पायलट होण्यापर्यंत मजल मारली आहे.

गेल्या पावणे दोन वर्षांपासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. या कालावधीत शाळा, महाविद्यालये बहुतांश काळ बंदच राहिली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर द्यावा लागला आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाली. बससेवाच सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र, शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज 30 ते 40 रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अडीचशे तीनशे रुपये खर्च करण्याची ऐपत नसणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये खर्च करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. या महागाईने गोरगरिब जनतेचे दोन वेळचे भोजन महाग केले आहे. तेथे खासगी वाहनाने जाण्यासाठी दररोज 30 ते 40 रुपये कोठून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनी महाविद्यालये व शाळेत न जाता ऑनलाईनला पसंती दिली आहे.
पालकांतूनही संताप व्यक्त होत असून या संपाबाबतच्या निर्णयावर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.