शहर पोलिस स्थानकातून फरार चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने शहर पोलिस ठाण्याच्या बांधावरुन पळालेल्या सराईत चोरट्याच्या मुसक्या मंगळवारी कल्याण येथून रेल्वे पोलिस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने  आवळल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 19 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दत्तात्रय शिवाजी गोडसे (रा.सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी खेड रेल्वे स्थानकात लाखोंची चोरी झाली होती.त्यामध्ये दत्तात्रयचाच हात असावा या संशयातून रेल्वे पोलिसांनी त्याला शनिवारी पहाटे अटक केली होती.त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या हवाली करण्यात येउन शहर पोलिसांनी त्याच्या हातात आपल्या कडील बेड्या घातलेल्या होत्या.परंतू तक्रार देण्यावरुन दुपारपर्यंत रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस यांच्यात चर्चा सुरु असताना दत्तात्रयला शहर पोलिस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आलेले होते.काहीवेळाने बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने दत्तात्रयने रेल्वे पोलिसांच्या हाताला झटका देत शहर पोलिस ठाण्याच्या बांधावरुन पळ काढला होता.अट्टल चोरटा हातावर तुरी देउन पळाल्यानंतर रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावलेली होती.तीन दिवस अथक प्रयत्न करुन अखेर मंगळवारी कल्याणमधून दत्तात्रयला अटक करण्यात शहर पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले.

  ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी आणि रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक अजित मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्यातील नितीन जाधव,वैभव नार्वेकर आणि रेल्वे पोलिस बलचे रोहिदास भालेराव,आशिष कुमार यांनी केली.