रत्नागिरी:- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री तथा परिवहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार एसटीप्रमाणेच आता ग्रामीण भागातून येणाऱ्या शहर बसच्या तिकिटातही महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असे आश्वासनही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
प्रजासत्त दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिला. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्याचा ३०० कोटींचा आराखडा असून शासन निश्चित यावर्षी वाढवून देईल. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या सर्व योजनांसाठी नियमानुसार खर्च करण्याचे नियोजन आम्ही सर्व करत आहोत. पोलिसांच्या घरांचा प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या वाहनांचा वा सीसीटीव्हीचा प्रश्न असो ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा जिल्हा आहे. त्या अनुषंगाने प्राणी संग्रहालयाच्या कामास सुरवात झाली आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ४ फेब्रुवारीला होत आहे.
विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. काजूबोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबाबोर्ड असावे, अशी आंबा बागायतदारांची मागणी होती. त्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील.
सर्वसामान्य विमान प्रवास करतील
सर्वसामान्य माणसाला विमानप्रवास करता यावा यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल. त्याला विमानप्रवास करता येईल असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.