रत्नागिरी:- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय रत्नागिरी अन्न व औषध प्रशासन आणि शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त भरारी पथकाने मंगळवार 4 जानेवारी 2021 रोजी रत्नागिरी शहर परिसरातील टपरी व दुकानांवर छापे टाकले.
यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा 2003 (कोटपा कायदा 2003) अन्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल तपासणींअती 44 टपरीधारक व दुकानदारांवर 30 हजार 400 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकाने अचानक छापा टाकत दुकानदारांची झडती घेण्यास सुरुवात केली. दुकानदारांची तपासणी करत असताना काही दुकानदार दोषी आढळले. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी भरारी पथकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सई धुरी, श्रीमती प्राची भोसले, समुपदेशक सचिन भरणे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गुंजाळ, दशरथ बाभळे, अन्न सुरक्षा अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती रिशीता गावकर, पोलीस नाईक प्रवीण वीर व सहकारी मिलींद कदम आदी उपस्थित होते.