रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथे वॉचमनच्या खूनासाठी वापरण्यात आलेला दांडका संशयित आरोपी वेदांतने घटनास्थळापासून काही अंतरावर झुडपामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला होता. खूनाच्या तपासामध्ये ही बाब समोर आली असून पोलिसांकडून आता हा दांडका ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान खून करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांकडून आता पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम २०१ लावण्यात येणार आहे.
अशोक महादेव वाडेकर (७०, रा. गवळीवाडा रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. अशोक हे घरापासून जवळच असलेल्या श्री गणेश रेसिडेन्सी इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होते. याच इमारतीमध्ये संशयित आरोपी वेदांत चंद्रकांत आखाडे हा देखील वास्तव्यास असतो. संशयित आरोपी वेदांतने गच्चीची चावी मिळावी म्हणून वॉचमन वाडेकर यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र वाडेकर हे चावी देत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. अशोक वाडेकर चावी देत नसल्याच्या रागातून २७ एप्रिल रोजी संधी साधून हा वेदांत याने लाकडी दांडक्याने वार करून अशोक वाडेकर यांचा खून केला, असा आरोप वेदांत याच्यावर ठेवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी वेदांत हा अशोक वाडेकर हे घराकडे जात असलेल्या वाटेवरच बसला होता. सायंकाळी ७ च्या सुमारास श्री गणेश रेसिडेन्सी इमारतीमधून आपल्या घराकडे निघाले होते. यावेळी वाटेवरच असलेला वेदांत हा त्यांना दिसला. यावेळी वेदांत याने आपल्याला गच्चीची चावी का देत नाही, अशी विचारणा वाडेकर यांच्याकडे केली. या कारणातून दोघांमध्ये वाद सुरू झाला. अशोक वाडेकर हे आपले ऐकत नसल्याचा राग वेदांत याला आल्याने त्याने जवळच पडलेला लाकडी दांडका उचलून वाडेकर यांच्या डोक्यात मारला. घाव वर्मी लागल्याने वाडेकर हे खाली कोसळले. मात्र यावर समाधान न झालेल्या वेदांत याने दांडक्याने वाडेकर यांचे डोके चेचून काढले. वेदांत याच्या या हल्ल्यात वाडेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान आपण पकडले जाऊ, असे वेदांत याला वाटल्याने त्यांने लाकडी दांडका घटनास्थळापासून काही अंतरावर झुडूपात फेकून दिला व तो काहीच घडले नसल्याचा आव आणत आपल्या घरी आला.
पोलिसांनी वेदांत याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. तसेच लाकडी दांडका हाही झुडूपात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी हा दांडका घटनास्थळापासून काही अंतरावरील झुडूपातून हस्तगत केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.