वैद्यकीय महाविद्यालयात निवृत्त डॉक्टरचा जोरदार गोंधळ

रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयात एका निवृत्त डॉक्टरने जोरदार गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १२ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. दारूच्या नशेत थेट महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करत या निवृत्त डॉक्टरने डीन, डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित डॉक्टर हे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दारूच्या नशेत दाखल झाले. यावेळी त्यांनी डीनसह डॉक्टर आणि कार्यकारी अधिकारी यांच्याशी आरडाओरडा करत वाद घालण्यास सुरुवात केली. काम करु देणार नाही, पदावरून काढून टाकीन, प्रमोशन थांबवेन अशा स्वरुपाच्याही धमक्या दिल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी पोलीस प्रशासनाला पत्र लिहून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.