दापोली:- दापोली तालुक्यातील वेळवी येथे गुरूवारी मध्यरात्री दीप्ती ऑइल ट्रेडर्स व जनरल स्टोअर, राजे सीएससी सेंटर, श्री स्वामी समर्थ मोटर्स अँड गॅरेज अशी तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडून रोख रक्कम तसेच मुद्देमान चोरून नेला. तीन दुकाने मिळून सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये मुद्देमाल व दुकानांमध्ये ठेवलेली रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले.
सविस्तर वृत्त असे की, सकाळी दुकान उघडण्यासाठी सीएससी सेंटरमधील ऑपरेटर दुकानात आले असता त्यांना तिन्ही दुकानांचे शटरचे कुलूप तोडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी दीप्ती ऑइल ट्रेडर्सचे दुकानदार ऋतिक इवलेकर यांना फोन करून कल्पना दिली. दुकानाच्या मालकांनी येऊन दुकानाची पाहणी केली असता दुकानाच्या शटरचे कुलूप फोडल्याचे त्यांचे निदर्शनात आले. त्यांनी वेळवीचे पोलीस पाटील रेवा झगडे यांच्याशी संपर्क केला. दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आयरे तसेच रत्नागिरीतून श्वान पथक व अंगठ्याचे ठसे तपासणारे टीम घेऊन घटना स्थळी दाखल झाले. पुढील तपास दापोली पोलीस करित आहेत.