लांजा: लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचांना शासकीय कर्तव्य बजावत असताना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. रामवाडी राम मंदिराच्या रोडवर २९ मे रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेरवली बुद्रुक रामवाडी गावच्या सरपंच २९ मे रोजी दुपारी रामवाडी येथील राम मंदिराच्या रोडवर बंद केलेला डांबरी रस्ता लोकांच्या वाहतुकीसाठी खुला करत होत्या. त्या लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना, आरोपी स्नेहा संतोष भिंगार्डे (वय ५४), कुणाल संतोष भिंगार्डे (वय २५) आणि माधव शंकर कोळवणकर (वय ६२, सर्व रा. वेरवली बुद्रुक, रामवाडी, लांजा) यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी सरपंचांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकसेवक साक्षीदारांना दबाव टाकत परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, तिन्ही आरोपींनी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करत धक्का बुक्की केली. लोकसेवक म्हणून करत असलेल्या कार्याला पूर्णपणे मज्जाव करून त्यांनी दगड लावून रस्ता पुन्हा पूर्णपणे बंद केला. यामुळे शासकीय काम पूर्ण होऊ शकले नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सरपंचांनी २९ मे रोजी रात्री ८.४७ वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. ११०/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३२, १२६ (१) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.