वेरळ येथे बंद घराचे कुलूप तोडून १ लाखाचा मुद्देमाल लंपास

खेड:- तालुक्यातील वेरळ येथे एका बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत केतन वसंत मोरे (वय ४९, व्यवसाय नोकरी, सध्या रा. दादर, मुंबई, मूळ रा. वेरळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोरे यांचे वेरळ येथे घर असून ते कामानिमित्त मुंबई येथे असतात. २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत त्यांचे घर बंद असताना, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली १ लाख रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या २०० नोटा), १ हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे कॉईन आणि १ हजार रुपये किमतीचा गणपती-लक्ष्मीचा फोटो असलेला आयताकृती बॉक्स असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

केतन मोरे यांच्या फिर्यादीनुसार ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.