Wednesday, September 23, 2026
spot_img
Home खेड वेरळ येथे दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी

वेरळ येथे दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास मोपेड दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH-08-AB-3398 क्रमांकाची मोपेड दुचाकी वेरळ परिसरातून जात असताना हा अपघात घडला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या शरीराला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
नागरिकांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधल्यामुळे रुग्णवाहिका काही वेळात घटनास्थळी दाखल झाली. जखमी तरुणाला तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोपेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतुकीवरही काही वेळ परिणाम झाला होता.

हा अपघात दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने झाला की अन्य किसी वाहनाच्या धडकेने, याबाबतची अधिकृत माहिती आणि जखमी तरुणाची ओळख तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.