लांजा:- वेरळ घाटात महामार्गाच्या कडेला कार उलटून पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अपघातग्रस्त कारमध्ये कोणीही नसल्याने चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता तो लांजा येथील एका लॉजवर सुरक्षित असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांसह घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरळ घाटात पांढऱ्या रंगाची टाटा हॅरियर (डीएल २ सीबी ८२७०) महामार्गाच्या कडेला उलटलेल्या अवस्थेत आढळली. हा अपघात रात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघातग्रस्त कार दिसल्यानंतर काही जण मदतीसाठी थांबले. मात्र, कारमध्ये कोणीही आढळले नाही.
अपघातात कोणी गंभीर जखमी झाले आहे का, अथवा कोणी वाहनात अडकले आहे का, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने वाहनचालकांनी लांजा पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी धाव घेत कारच्या क्रमांकावरून मालकाचा शोध सुरू केला.
कार दिल्ली येथील सुरेंद्र शर्मा यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी शर्मा हे लांजा येथील एका लॉजवर सुरक्षित असल्याचे समजले. अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. कार उलटून पडलेली असताना त्यातील व्यक्ती सुरक्षित असल्याचे समजताच घटनास्थळी उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.









