वृद्ध महिलेचे दागिने लुटणाऱ्या दाम्पत्याला पोलिस कोठडी

रत्नागिरी:- सदनिका मालक असलेल्या वृद्ध महिलेचे टॉवेलने तोंड बांधून त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेणाऱ्या आरोपी दाम्पत्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दाम्पत्याच्या दोन मुलांना पोलिसांनी त्यांच्या संगोपनासाठी बालसुधार गृहात दाखल केले आहे.

रत्नागिरी शहरातील लता टॉकीजजवळ राहणाऱ्या सुनंदा श्रीराम पटवर्धन (वय ७२) यांच्याकडे शेखर तळवडेकर (४७), पत्नी आश्लेषा तळवडेकर (४७) हे दाम्पत्य प्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने गेले होते. फ्लॅट मालक असलेली वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी दाम्पत्याने त्यांचे तोंड टॉवेलने बांधले. वृद्ध महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मारहाणही करण्यात आली.

या मारहाणीत बेशुद्ध झाल्यानंतर फ्लॅटमालक महिलेच्या अंगावरील १ लाख ६४ हजार रुपये किमतीचे दागिने जबरीने काढून नेले. यासंदर्भात शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी दाम्पत्याला एक १४ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षीय मुलगा आहे. आई-वडिलांना अटक झाल्याने त्यांच्या दोन्ही मुलांच्या संगोपनाची हेळसांड होऊ नये, यासाठी मुलांना बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.