वृद्धेचे दागिने पळविणाऱ्या जोडप्याला २४ तासांत अटक

रत्नागिरी:- शहरामध्ये भरदिवसा घरात घुसून वृद्धेला मारहाण करून दागिने हिसकावत जबरी चोरी करणाऱ्या सावंतवाडीतील जोडप्याला २४ तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शेखर रमेश तळवडेकर (वय ४७), सौ. आश्लेषा शेखर तळवडेकर (४८, दोन्ही रा. ओम शांती प्लाझा, लक्ष्मी चौक, गाडीतळ रत्नागिरी, मूळ रा.तळवडे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) असे अटक केलेल्या जोडप्याचे नाव आहे. काल सकाळी ०८.४५ च्या सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील वॉशिंग रॅम्पनजीक ही घटना घडली. वृद्धा घरामध्ये एकट्याच असतात. त्यांना मारहाण व दुखापत करून त्यांच्या हातामधील दोन सोन्याच्या बांगड्या व गळ्यामधील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केलेली होती. शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना केली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक पथक तात्काळ नियुक्त करून समांतर तपास सुरू केला.

तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीवरून गुन्हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हिच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेले एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत. निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर, विवेक रसाळ, वैदेही कदम, दत्तात्रय कांबळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.