वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी निवडला ‘कॅशलेस’ पर्याय

रत्नागिरी:-नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणार्‍या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीत एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल 76 टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोकण विभागात  72.46 कोटी (58.99 टक्के) वीजबिल रकमेचा भरणा ऑनलाईन करण्यात आला आहे.

महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सर्व प्रकारची सेवा डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये लघुदाब ग्राहकांसाठी ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय उपलब्ध करून दिलेली
आहे.

प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये महावितरणच्या सर्वच परिमंडलातील उच्च व लघुदाबाच्या  ग्राहकांनी एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल 4 हजार 636 कोटी (76 टक्के) रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडलात 895 कोटींच्या (80 टक्के) वीजबिलांचा भरणा केला आहे. त्यानंतर भांडूप परिमंडलातील  ग्राहकांनी 834 कोटी (84.30 टक्के) तर कल्याण परिमंडलामध्ये  ग्राहकांनी 573 कोटी 15 लाखांच्या (77.34 टक्के) बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

उर्वरित परिमंडलांमध्ये औरंगाबाद परिमंडलात  307.41 कोटी (84.4 टक्के), लातूर-  59.92 कोटी (49.1 टक्के), नांदेड- 44.86 कोटी (47.8 टक्के), जळगाव-  118.44 कोटी (61.2 टक्के), कोकण-  72.46 कोटी (58.99 टक्के), नाशिक- 340 कोटी (73.3 टक्के), अकोला-  50.40 कोटी (46.3 टक्के), अमरावती-  65.28 कोटी (47.9 टक्के), चंद्रपूर-  80.11 कोटी (64.5 टक्के), गोंदिया- 48.33 कोटी (62.8 टक्के), नागपूर-  323.57 कोटी (69.4 टक्के), बारामती- 5.11 425.38 कोटी (76.9 टक्के) आणि कोल्हापूर परिमंडलामध्ये 319 कोटी रुपयांच्या (73.2 टक्के) वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास 0.25 टक्के ( रू.500 पर्यंत)  सूट प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात असला तरी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.