Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे समुद्रात बुडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू

गणपतीपुळे समुद्रात बुडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा समुद्राच्या लाटेचा फटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संध्या स्वप्नील कांबळे (वय २४, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास संध्या कांबळे ही गणपतीपुळे येथील प्रसिद्ध मंदिराच्या परिसरातील समुद्रात खेळत होती. दरम्यान, समुद्राची एक मोठी लाट अचानक तिच्या पाठीवर जोरात आदळली. या धक्क्याने ती तोंडावर खाली पडली, परिणामी तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.

बेशुद्ध पडलेल्या संध्याला तत्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २६ मे रोजी सकाळी ९:३० वाजता तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.