रत्नागिरी:- वित्त कंपनीतून बडतर्फ केलेल्या एकाने कंपनीचीच १ लाख १० हजार रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. दुसऱ्या ग्राहकांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन, त्याआधारे मोबाईल आष्टा (जि. सांगली) येथून खरेदी करून फायनान्स कंपनीची व ग्राहकाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुशांत अशोक कोडोलकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात राहुल बबन पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. २० मे ते २० ऑगस्ट या दरम्यान हा प्रकार घडला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील एका वित्त कंपनीच्या शाखेत सुशांत कोडोलकर हा यापूर्वी करत होता. त्याला सध्या कंपनीतून बडतर्फ केले आहे. त्याने कंपनीचे जुने ग्राहक श्रृतिका शिरगांवकर यांच्या आधारकार्डावरील मूळ पत्त्यावरील जिल्हा व पिनकोड बदलले. त्या ठिकाणी सांगली जिल्हा व पिनकोड ४१६३०१ नमूद केला. ग्राहकाचा बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन श्रुतिका यांच्या फोटोच्या जागी अनोळखी महिलेचा फोटो वापरला. ग्राहकाच्या मोबाईल नंबरवर ओटीपी न पाठवता तो बायपास करुन त्यावर आधारकाडर्वरील जन्मतारीख टाकून हा मोबाईल आष्टा येथील एका मोबाईल शॉपीतून खरेदी करण्यासाठी स्वतःच्या आयडीवरुन कर्ज प्रकरण मंजूर केले. त्याचे दोन हप्ते श्रुतिका यांच्या बँक खात्यातून कट झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संशयिताने ग्राहकाच्या नावे बवानट कागदपत्रे तयार करून स्वतःच्या आयडीवरुन १ लाख १० हजार कर्ज घेऊन कंपनीची व ग्राहकाची फसवणूक केली.