रत्नागिरी:- अंदाजे पावणे चार वर्षांपूर्वी शहरातील विठ्ठल मंदिराबाहेर झालेल्या मारहाणीतील 8 संशयितांची न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाशिध ला.द.बिले यांनी दिला.
संतोष उर्फ चिम्या दामोदर साबळे(40), स्मीत संजय साळवी(29), उदय विलास सावंत(38), शुभम संजय साळवी(23), स्वप्नील प्रकाश साबळे(22), नागेश प्रकाश गजबार(22), प्रवीण प्रकाश साबळे(30), मयुर रघुनाथ भुवड (28,सर्व रा.झाडगाव नाका,रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 18 मार्च 2018 रोजी रात्री 12 वा.सुमारा विठ्ठल मंदिराबाहेर रस्त्यावर गुढि पाडव्यानिमित्त मंदार मयेकर व त्याचे साथीदार रांगोळी काढत होतेे. त्यावेळी चिम्या साबळे तिथून गाडीतून जात असताना मंदार मयेकरने त्याला गाडी रांगोळीवरुन न नेता बाजून नेण्यास सांगितले होते. याचा राग मनात धरुन चिम्या साबळे आणि अन्य संशितांनी मंदार आणि त्याच्या सोबत असलेले आदित्य पांचाळ, पराग तोडणकर, समीर तिवरेकर, केदार मयेकर, अभि पवार, दादू शिंदे, निखिल चव्हाण, सुनिल सावंत यांना लाथा-बुक्कयांनी, हॉकि स्टीक, बेसबॉल स्टिक आणि काठ्यांनी जबर मारहाण केली होती.
या मारहाणीत मंदार मयेकर हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी राजेश तोडणकरने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार पोलिसांनी संशयितांविरोधात भादंवि कलम 307, 143, 147, 148, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता.या खटल्यातील 5 साक्षीदार फितूर झाले. तसेच अंधारात आपल्याला कोणी मारहाण केली हे दिसू न शकल्याचा जबाब मंदारने न्यायालयात दिल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या विसंगत जबाबामुळे न्यायालाने संशयितांची निर्दोष मुक्तता केली.