विजबिल वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास रोखठोक उत्तर: आ.प्रसाद लाड

रत्नागिरी:- विजबिल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचे जाहीर करुन आपण हुकुमशहा आहोत, हे दाखवून दिले आहे. वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि भाजप रोखठोक उत्तर देईल, असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर आमदार लाड पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पेट्रोल, डिझेल वाढीसह राज्यातील विजबिल वसुलीबाबत सरकारकडून घेतलेल्या भुमिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, कोरोना कालावधीत अनेकांना परिस्थिती अभावी विजबिल भरता आलेले नाही. थकित बिले वसुलीसाठी सरकारने पोलिसी बळाचा वापर करुन असे जाहीर केले आहे. यातून आपले सरकार हुकुमशहा आहे, हे दाखवून देतेय. ही बिले पोलिसांनाही आली आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना असे संरक्षण देतील का. सामान्य जनतेला दंडुकेशाही दाखवून वसुली केली जात असेल तर तो अन्याय आहे. याचे उत्तर जनताच देईल. सामान्यांवर असा दंडुका मारणार असतील तर भाजप फक्त रोखठोक वाचून नव्हे तर प्रत्यक्षात रोखठोक उत्तर देण्यासाठी आंदोलन करेल.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत ते म्हणाले की आंतरराष्ट्रीयस्तरावर दर वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला निर्णय घ्यावे लागले; परंतु राज्य सरकारने दुष्काळासह विविध गोष्टींसाठी वाढवलेले कर रद्द करुन सामान्य जनतेला दिलासा देता येऊ शकतो. गोवा, गुजरातसारख्या भाजपशासीत राज्यात इंधन दर कमी आहेत. महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घ्यावा. परंतु ते तसं न करता केंद्र सरकारवर बोट दाखवत आहेत.