Monday, May 11, 2026
spot_img
Home चिपळूण प्रवास करताना महिलेचा आकस्मिक मृत्यू

प्रवास करताना महिलेचा आकस्मिक मृत्यू

कामथे घाटातील घटना

चिपळूण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना, एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा चालत्या गाडीतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. रेश्मा रमेश कांबळी (रा. उलवे, नवी मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा कांबळी या आपल्या मुलगी स्वाती कांबळी, पती आणि ड्रायव्हर श्रीकांत पेडणेकर यांच्यासह हुंदाई वेन्यू गाडीने कणकवली येथून नवी मुंबईतील उलवे येथील आपल्या घरी परतत होत्या. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी गोवा-मुंबई महामार्गावरील कामथे घाट उतरत होती.

या प्रवासादरम्यान रेश्मा यांच्या शरीरात काहीही हालचाल होत नसल्याचे त्यांची मुलगी स्वाती यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

​दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रेश्मा कांबळी यांची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कांबळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.