Monday, June 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर ‘फायटर’ने प्राणघातक हल्ला

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर ‘फायटर’ने प्राणघातक हल्ला

दापोली जालगाव येथील घटना

दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे एका कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर एका इसमाने धारदार ‘फायटर’ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी प्रकाश पवार (वय ३२, रा. नवशी शिगवणवाडी) याची बहीण मनिषा दयानंद चव्हाण आणि तिचे पती दयानंद सर्जेराव चव्हाण यांच्यात काही कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सनी पवार आणि त्याचा भाऊ सचिन प्रकाश पवार हे जालगाव येथील मराठी शाळेजवळ आरोपी प्रमोद बजीरंग साळुंखे याच्या घरी गेले होते.

तेथे पोहोचताच आरोपी प्रमोद साळुंखे याने या दोघा भावांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील ‘फायटर’चा वापर करून सनी पवार याच्या डाव्या कानाच्या बाजूला डोक्यात प्रहार केला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सचिन प्रकाश पवार याच्या ओठावरही आरोपीने वार केले, ज्यात तो जखमी झाला. यानंतर “तुम्हा दोघांना बघून घेतो,” अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेला.

या घटनेनंतर जखमी सनी प्रकाश पवार याने दिलेल्या तक्रारीवरून, दापोली पोलिसांनी आरोपी प्रमोद साळुंखे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.