वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात सोमवारी दक्षिण रत्नागिरी भाजपतर्फे महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, राजेश सावंत, सचिन करमरकर, उमेश कुलकर्णी, ऐश्‍वर्या जठार, प्राजक्‍ता रुमडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवास्तव वीजबिल आकारणी संदर्भात महावितरणच्या विरोधात जनतेचा आक्रोश शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी, राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व वीजबिले माफ व्हावीत यासाठी रत्नागिरीत सकाळी 11 वाजता नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजप पदाधिकारी, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला मोर्चा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लॉकडाऊनच्या कालावधीतील बिले माफ झाली पाहिजेत, अशी भाजपची आग्रही भूमिका आहे. यापुढे अशी वाढीव वीजबिले येऊ नयेत व शेतकरी वापरीची वीजबिले पूर्णपणे माफ करावीत, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरणच्या पर्यायाने राज्य शासनाच्या अन्याय्य धोरणाचा निषेध करत बिले फाडून टाकून निषेध नोंदवण्यात आला. तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांना वीजबिल माफीसंदर्भात निवेदन देण्यात आले. वरिष्ठस्तरावरून याबाबत कार्यवाहीसाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.