Monday, June 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील जप्त कार मूळ मालकाला परत मिळणार

वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील जप्त कार मूळ मालकाला परत मिळणार

भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यासाठी कारचा केला होता वापर

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या कारने आंबा घाट येथे फेकून देण्यात आला होता ती कार मूळ मालकाला परत देण्याचे आदेश रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. खुनाचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली कार आपल्याला मिळावी असा अर्ज न्यायालयापुढे कार मालकाकडून करण्यात आला होता.

दुर्वास दर्शन पाटील (२५, रा.जंगमवाडी वाटद खंडाळा), विश्वास विजय पवार (४१, रा. कळझोंडी बौद्धवाडी, रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (४०, रा. आदर्शनगर वाटद खंडाळा रत्नागिरी) या तिघांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी मिरजोळे येथील रहिवासी भक्ती मयेकर हिचा गळा आवळून खून केला. तसेच तिचा मृतदेह वॅगनार कार (एमएच ०८ एएन ५५०१) मधून नेत आंबा घाट येथे फेकून दिला होता. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास करताना ही कार जप्त करण्यात आली होती.

गुन्ह्यातील माहितीनुसार भक्ती जितेंद्र मयेकर (२५, रा. मिरजोळे रत्नागिरी) हिचे दुर्वास याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र दुर्वास याने तिच्याशी काडीमोड करत अन्य एका मुलीशी लग्न जमविले होते. मात्र भक्ती ही लग्नाचा तगादा लावत असल्याने आपले ठरलेले लग्न मोडेल या भीतीने दुर्वास याने तिचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुर्वास याने भक्ती हिला खंडाळा येथील सायली बार येथे बोलावून घेतले आणि तिचा खून केला. यानंतर मृतदेह वॅगनार कारमधून आंबा घाट येथे नेऊन टाकला.

भक्ती मयेकर हिच्या खुनाच्या तपासामध्ये दुर्वास याने राकेश जंगम व सीताराम वीर यांचा खून केल्याचेही उघड झाले होते.