चालक गंभीर, ४ महिला प्रवासी जखमी
लांजा:- महामार्गावर उभे असलेला कंटेनरला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षातील महिला प्रवाशांसह रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वाकेड घाट येथे घडला.
दरम्यान, अपघातात रिक्षाचालक अविनाश चंद्रकांत शिंदे (वय- २८, रा.कणगवली शिंदेवाडी, ता.लांजा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर जखमी चार महिलांपैकी एका महिलेवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून किरकोळ जखमी झालेल्या तीन महिलांना लांजा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथे महिलां प्रवाशांना घेऊन अविनाश शिंदे हा आपल्या ताब्यातील रिक्षा क्रमांक (एमएच.०८.बीसी.३२५६) घेऊन गेला होता. जाताना तो साटवली मार्गे गेला तर परतीचा प्रवास करताना रिक्षातून चार महिलांसह लांजाकडे ओणी मार्गे निघाला होता. रिक्षा वाकेड घाटात आली असता शिंदे याचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने त्याने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला (क्रमांक एमएच.४६.सीयु.०५७८) मागून जोरदार धडक दिली. रिक्षाची धडक एवढी जबर होती की, रिक्षाच्या पुढील भाग दबला गेला व कंटेनरच्या मागील बाजूचा रॉड रिक्षाचालक शिंदे याच्या डोक्याला आदळला. यामध्ये अविनाश शिंदे याच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तर रिक्षामध्ये मागे बसलेल्या चारही महिला जोरदार आपटल्याने त्यांना इजा झाली.
या अपघाताची माहिती लांजा पोलीस ठाण्याला मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले. मात्र चालक अविनाश शिंदे व एका महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. रिक्षा चालक अविनाश शिंदे याची प्रकृती गंभीर बनल्याचे त्याला अधिक उपाचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले घडला.









