रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलाने विविध पातळीवर आपल्या कामगिरीची मोहर उमटवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८० टक्के, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडील गुन्ह्यामध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ३१ टक्केवरून ७० टक्केवर गेले आहे. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ९२ टक्के तर मुद्देमाल नष्ट करणे, समन्स आदीमधील आकडेवारी पोलिसांच्या कामगिरीचा आलेख उंचावणारी आहे.
पत्रकार दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या पोलिस पत्रकार संवादामध्ये ही माहिती दिली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांनी याचे प्रेझेंटेशन केले. भाग एक ते पाच या गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये एकूण १ हजार ३५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ०६८ टक्के गुन्हे उघडकीस आले. हे प्रमाण ७८.०७ टक्के होते. ते गेल्यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये १ हजार ४१२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १ हजार १३४ गुन्हे उघडकीस आले. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण ८०.३१ टक्के आहे. प्रतिबंध आणि जुगार केसेसचे प्रमाणही नियंत्रणात आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई २०२० मध्ये २ हजार २७४ जणांवर केली होती. २०२१ मध्ये ३ हजार १२७ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिस ठाणेनिहाय दाखल झालेल्या गुन्हेगारीच्या केसेस प्रलंबित असण्याचे प्रमाणही मोठे होते. २०२० मध्ये ४१ टक्के प्रलंबित केसेस तर निकाली काढण्याचे प्रमाण ५९ टक्के होते. २०२१ मध्ये प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण फक्त ८ टक्के आहे आणि केसेस निकाली काढण्याचे हे प्रमाण ९२ टक्केवर गेले आहे. राज्यात हे प्रमाण सर्वांत जास्त असल्याचा दावा डॉ. गर्ग यांनी केला आहे. विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने जास्तीत जास्त प्रमाणात नष्ट केला जाते. वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा होण्याच्या प्रमाणामध्येही मोठी वाढ झाली आहे. २०२० मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडील गुन्ह्यामध्ये ३१ टक्के केसेसमध्ये शिक्षा झाली होती. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांना २५ टक्केच शिक्षेचे प्रमाण होते. मात्र २०२१ मध्ये यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हे दाखल करताना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. गर्ग आणि सरकारी वकील यांच्याशी चर्चा करून गुन्हे दाखल केल्याने शिक्षेच्या प्रमाणात २०२१ मध्ये वाढ झाली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱी यांच्याकडील गुन्ह्याध्ये शिक्षा होण्याच्या प्रमाणात तब्बल ७० टक्केंनी वाढ झाली आहे. जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडील गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण २७ टक्के आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पताळवीर प्रचंड मेहनत घेण्यात आली होती. त्याचे हे फलित असून या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहोत.
– डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी