वरचा फगरवठार येथे गांजा विक्री करताना एकजण ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलिसांनी वरचा फगरवठार येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात एका व्यक्तीला गांजा विक्री करताना रंगेहाथ पकडले. जुबेर हुसेन शेखासन (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा १३९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७.२० वाजता करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार शांताराम रामचंद्र झोरे (वय ४८) यांनी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी जुबेर शेखासन हा वरचा फगर वठार येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारातील एका पडीक इमारतीत गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीतील हिरवट काळपट रंगाचा, उग्र वासाचा १३९ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १० हजार रुपये आहे.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.