वनविभागाकडून फरार सूत्रधाराचा शोध सुरू

चिपळूण:- व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणात चौघांना मुद्देमालासह जेरबंद केल्यानंतर फरार असलेल्या पाचव्या संशयित आरोपीच्या मागावर वनविभागाचे पथक आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय असल्याने त्यादृष्टीने वनविभागाकडून तपास सुरू आहे.

उलटी संदर्भात माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पंधरा दिवसांपासून लावलेल्या सापळ्यात मंगळवारी मंडणगड, दापोलीतील एका डॉक्टरसह चौघेजण मुद्देमालासह अलगद अडकले. प्रकाश तुकाराम इवलेकर, दिलीप पांडुरंग पाटील, प्रविण प्रभाकर जाधव, अनिल रामचंद्र महाडिक यांच्यावर वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून महामार्गावर वालोपे येथील पेट्रोल पंपावर तीन किलो, तर फरार सूत्रधारांच्या दापोलीतील घरावर छापा मारून सात किलो अशी एकूण दहा किलो उलटी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चारही संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. गुरूवारी मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या चौघांनी दापोलीतील मच्छीमाराकडून ही उलटी मिळवली होती. त्याचे नाव पुढे आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याच्या निवासस्थानावर छापा मारत सात किलो उलटी जप्त केली. मात्र तो फरार असल्याने आता त्याचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे.